जळगाव -महावितरण कंपनीचे वायरमन गजानन प्रताप राणे यांच्या मृत्यू प्रकरणात भडगाव पोलिसांनी ६ संशयित आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील १ संशयित अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या संशयितांमध्ये ५ जण हे पाचोरा येथील, तर १ भडगावचा रहिवासी आहे. जितेंद्र विश्वासराव पेंढारकर, अनिल बारकू पाटील, संदीप रामदास पाटील, सुमित रवींद्र सावंत, गणेश सुदाम चौधरी (सर्व रा. पाचोरा) आणि चरणसिंग प्रेमसिंग पाटील (रा. वडगाव सतीचे, ता. भडगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण? -
महावितरण कंपनीकडून ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून कृषी पंपांच्या वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कंपनीच्या कार्यालयांना टाळेठोक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर भडगावातील महावितरणच्या कार्यालयात गोंधळ झाला होता. अज्ञात ७ जणांनी यावेळी उप कार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (४३) रा. पाचोरा यांना मारहाण केली होती. तसेच कॅबिनमध्ये असलेले संगणक, युपीएस तसेच टेबल व कॅबिनच्या काचा फोडत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते. यावेळी जमावाने वायरमन गजानन राणे यांनाही धक्काबुक्की करत मारहाण केली होती. त्यात जमिनीवर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अजय धामोरे यांच्या तक्रारीवरून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ६ जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - हुश्श!मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट कमी होऊन ४.४० टक्के!