महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक! जळगावात डेल्टा प्लस व्हेरियंटचे पुन्हा 6 नवे रुग्ण - जळगावात डेल्टा प्लस नवे रुग्ण

कोरोनाची रुग्णसंख्या घटत असतानाच, जिल्ह्यात 3 ठिकाणी कोरोनाचा नवा आणि घातक व्हेरियंट मानला जाणारा डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 13 रुग्ण आढळून आले आहेत.

Jalgaon latest news
जळगावात डेल्टा प्लस व्हेरियंटचे पुन्हा 6 नवे रुग्ण

By

Published : Aug 9, 2021, 5:12 PM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटत असतानाच, जिल्ह्यात 3 ठिकाणी कोरोनाचा नवा आणि घातक व्हेरियंट मानला जाणारा डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी साधारण 2 महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एकाच गावात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळले होते.

आता 3 तालुक्यात आढळले 6 रुग्ण -

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये जिल्ह्यात पुन्हा 6 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे हे सर्व रुग्ण जळगाव, जामनेर आणि पारोळा या वेगवेगळ्या तालुक्यातून समोर आले आहेत. जळगावात 2, जामनेरात 3 तर 1 रुग्ण पारोळा तालुक्यातील आहे. नव्याने आढळलेल्या सहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते कोरोनातून बरे झालेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्ण -

आरोग्य यंत्रणेच्यावतीने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी मे महिन्यात पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लसचे 7 रुग्ण समोर आले होते. हे सातही बाधित पारोळा तालुक्यातील एका गावातीलच होते. त्यानंतर या ठिकाणी मोठी रुग्णवाढ आढळून आली नव्हती. या घटनेनंतर जळगावातून जून व जुलै महिन्यात 280 अहवाल पाठविण्यात आले होते. त्यातून आता 6 बाधित रुग्ण समोर आले आहेत. यातील तिघे जून महिन्यातील, तर 3 रुग्ण हे जुलै महिन्यातील बाधित आहेत, असेही डॉ. एस. एन. चव्हाण यांनी सांगितले.

बाधित रुग्ण 17 ते 60 वयोगटातील -

नव्याने आढळून आलेले 6 रुग्ण हे जून आणि जुलै महिन्यात बाधित झाल्याचे सांगितले जात आहे. बाधित असलेले सर्व रुग्ण हे पुरूष असून 17 ते 60 वयोगटातील आहेत. या भागांमध्ये आता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यात या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री, तसेच या रुग्णांचे लसीकरण झाले आहे का? याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

'जिनोमिक सिक्वेंसिंग' म्हणजे काय? -

कोविड- 19 प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोविड विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजेच 'जिनोमिक सिक्वेंसिंग' नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. जनुकीय क्रमनिर्धारण हे प्रयोगशालेय सर्वेक्षणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. हे जनुकीय क्रमनिर्धारण दोन प्रकारे करण्यात येत आहे. राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला 15 प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते. राज्य सरकारने जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणास गती मिळावी यासाठी कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून 100 प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती मिळाली.

हेही वाचा - लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज - नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details