जळगाव- शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात शिवकॉलनीतील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र भुयारी मार्ग असावा. या मागणीसाठी आज महापालिकेचे प्रभाग समिती सदस्य रवींद्र नेरपगारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक सी. एम. सिन्हा यांना नागरिकांनी सकाळी घेराव घातला. भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावास अधिकाऱ्यांनी तूर्तास मान्यता देत चौपदरीकरणाच्या मार्गावरील खडी काढून घेण्यात आली.
सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडे फारशी नागरी वस्ती नव्हती. मात्र आता निम्म्यापेक्षा अधिक जळगाव शहर महामार्गाच्या पलीकडे वसले आहे. दररोज या नागरिकांना महामार्ग ओलांडूनच ये-जा करावी लागते. महामार्गावरील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे शिवकॉलनी, आशाबाबानगर, हरीविठ्ठलनगर, आर.एम.एस. कॉलनीत जाताना महामार्गावरूनच जावे लागते. सुमारे पंचवीस ते तीस हजार लोकवस्ती येथे असताना शिवकॉलनीसमोर भूयार अधिकाऱ्यांनी तयार केला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शिवकॉलनीसमोर व रेल्वे बोगद्याला समांतर असे दोन भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी करण्यात आली. जर लवकर कामाला सुरुवात झाली नाही तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.