महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत मुक्ताईंच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान; हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली अवघी मुक्ताईनगरी - मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा न्यूज

कोरोनामुळे मुक्ताईनगरचा पारंपरीक पालखी सोहळा खंडीत होण्याची शक्यता होती. मात्र, राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला नेण्यास अनुमती दिली. पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच मुक्ताईंच्या पादुका पायी वारीने न जाता बसने पंढरपूरला जात आहेत.

Mukatai Palkhi
मुक्ताई पालखी

By

Published : Jun 30, 2020, 12:37 PM IST

Updated : Jun 30, 2020, 12:57 PM IST

जळगाव - आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री. संत मुक्ताई पालखी सोहळ्याने पंढरपूरसाठी आज प्रस्थान ठेवले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पालखी सोहळा मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच मुक्ताईंच्या पादुका पायी वारीने न जाता बसने पंढरपूरला जात आहेत. पालखी सोहळा प्रस्थानाच्यावेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमली होती.

मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरसाठी प्रस्थान

कोरोनामुळे पारंपरिक पालखी सोहळा खंडित होण्याची शक्यता होती. मात्र, राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेत मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला नेण्यास अनुमती दिली. दरम्यान, 33 दिवसांचा 750 किलोमीटरचा पायी प्रवास आणि वारकऱ्यांना मिळणारी सेवा यावेळी खंडीत झाल्याची खंत पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केली.

पालखी सोहळा प्रस्थानाच्यावेळी संस्थानचे अध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पंजाबराव पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, उपसरपंच उमेश राणे, उद्धव महाराज जुणारे, विनायकराव हरणे, विशाल महाराज खोले, नितीन महाराज महाराज, ज्ञानेश्वर हरणे, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, पंकज महाराज, पुरुषोत्तम वंजारी, सुधाकर सापधरे, निवृत्ती पाटील, यू. डी. पाटील, नरेंद्र नारखेडे आदींसह वारकरी व भाविकांची उपस्थिती होती.

असा असेल पालखी सोहळ्याचा कार्यक्रम-

हा पालखी सोहळा आज बसने प्रवास करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. वारकऱ्यांना बुलडाणा येथे राजेंद्र शिंगणे यांच्याकडे नाश्ता, दुपारी जालना येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडे फराळ व सायंकाळी वाशी (समरकुंडी फाटा) येथे चहापाण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पुढे वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांसोबत मुक्ताईंच्या पालखीची भेट होईल. तेथून पुढे सर्व मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील.

Last Updated : Jun 30, 2020, 12:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details