जळगाव -शहरातील बळीराम पेठेतील तहसील कार्यालयाला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत कार्यालयातील 3 खोल्यांमधील महत्त्वपूर्ण दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
जळगाव तहसील कार्यालयाला शॉर्टसर्किटने आग जिल्हा परिषदेची नवीन इमारत आणि तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीमागे पुरवठा शाखेला लागून रेकॉर्ड रूम आहे. या इमारतीमध्ये पुरवठा शाखेसह एकूण तीन खोल्या आहेत. वायरच्या वेटोळ्यांनी वेढलेल्या शेवटच्या खोलीला मध्यरात्री शॉर्टसर्किटने आग लागली. आगीमुळे दस्तऐवज जळत असल्याने इमारतीच्या खोल्यांच्या खिडक्यांमधून धुराचे लोळ बाहेर पडत होते.
हेही वाचा -हिंगणघाट जळीतकांड: दारोडावासीयांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे 'या' मागण्या
ही बाब जिल्हा परिषदेच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. मात्र, तहसील कार्यालयाची इमारत ही लाकडी तसेच कौलारू असल्याने आग क्षणार्धात भडकली होती. आगीमुळे पुरवठा शाखा तसेच रेकॉर्ड रूममधील दस्तऐवज जळाले.
रात्रीच्या वेळी ही घटना घडली. त्यामुळे सुदैवाने तहसील कार्यालयाच्या परिसरात वाहतुकीची वर्दळ नव्हती. अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने आग लवकर आटोक्यात आली. अन्यथा तहसील कार्यालयाच्या शेजारीच जिल्हा परिषदेची इमारत आहे. आग अजून भडकली असती तर जिल्हा परिषदेच्या इमारतीला देखील हानी पोहचली असती.
हेही वाचा -पाणीप्रश्नसाठी महिला उतरल्या रस्त्यावर; पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, नायब तहसीलदार सी. एम. सातपुते, मंडळाधिकारी योगेश नन्नवरे आदी घटनास्थळी दाखल झाले होते. 3 वर्षांपूर्वी देखील तहसील कार्यालयाच्या इमारतीला अशीच आग लागली होती.