महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून उघडणार - पालकमंत्री - जळगाव लेटेस्ट न्यूज

गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेली जळगावातील मॉल्स आणि शॉपिंग कॉप्लेक्समधील दुकाने उघडण्यास अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या 5 ऑगस्टपासून सर्व मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

gulabrao patil
पालकमंत्री गुलाबराव पाटील

By

Published : Aug 1, 2020, 9:07 PM IST

जळगाव - पहिल्या लॉकडाऊनपासून म्हणजेच, गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेली जळगावातील मॉल्स आणि शॉपिंग कॉप्लेक्समधील दुकाने उघडण्यास अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या 5 ऑगस्टपासून सर्व मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज (शनिवार) पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मका खरेदी बाबतचे शासकीय धोरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता याबाबतची माहिती दिली. तसेच दूध दरवाढी संदर्भात भाजपने केलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी भाजपला चिमटा देखील काढला. जळगावातील मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने गेल्या चार महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे व्यापारीवर्ग आर्थिक अडचणीत सापडला होता. आता राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता प्रदान करण्यास सुरुवात केली असून, टप्प्याटप्प्याने काही गोष्टींना सशर्त परवानगी दिली जात आहे.

जळगावातील मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून होऊ लागल्याने हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यास आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ही दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 5 ऑगस्टपासून सर्व दुकाने उघडतील. परंतु, व्यापाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुकानांवर गर्दी होणार नाही, प्रत्येकाने मास्क वापरावे, हँड सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन देखील गुलाबराव पाटील यांनी केले. दरम्यान, दुकाने उघडण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन योग्य ते दिशानिर्देश द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त 11 हजार 750 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेल्या 2 वर्षांपासून थकीत होता. याबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन या अधिकारी व कर्मचाऱ्यांना थकीत असलेल्या महागाई भत्त्याची रक्कम 61 कोटी 74 लाख रुपये अदा केली आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मका खरेदी संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने सरकारचे ऑनलाईन पोर्टल बंद झाले आहे. परंतु, अजूनही अनेक शेतकऱ्यांचा मका खरेदी होणे शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांनी मका खरेदीची नोंदणी केली आहे, त्यांची मका सरकारने खरेदी करावी किंवा त्यांना विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजपच्या आंदोलनास आमच्या शुभेच्छा-
दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने शनिवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी भाजपला चिमटा काढला. राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेच पाहिजे. आंदोलन हा कार्यकर्त्याचा मूळ स्वभाव असला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या जीवनात आंदोलन नसेल तर तो कार्यकर्ता असू शकत नाही. त्यामुळे भाजपच्या आंदोलनास आमच्या शुभेच्छा आहेत, असे सांगत गुलाबराव पाटील यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details