जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख व्यापारी संकुलातील दुकाने आठवड्यातून फक्त 4 दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनात सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, 5 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता जळगाव शहरातील व्यापारी संकुलातील दुकाने रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवार असे चारच दिवस सुरू असणार आहेत. तर मंगळवार, गुरुवार व शनिवारी दुकाने बंद राहतील.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. त्यातल्या त्यात जळगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने जिल्हा प्रशासनाने जळगावातील व्यापारी संकुले बंद ठेवली होती. मात्र, 4 महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. नियमांच्या चौकटीत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी म्हणून, व्यापारी आग्रही होते. ही बाब लक्षात घेऊन, सोमवारी जिल्हा प्रशासनाने व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. बैठकीस आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासोबत सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, गोलाणी मार्केट व इतर मार्केटचे पदाधिकारी उपस्थित होते.