जळगाव - भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली. याचा मला आनंद आहे, अशा शब्दात शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे एका लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. गुलाबराव पाटील यांनी यावेळी अमित शाह यांच्या टीकेला तर प्रत्युत्तर दिलेच, याशिवाय शेतकरी आंदोलनाबाबत सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार घेतला.
गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली काय म्हणाले होते अमित शाह?
भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शाह हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. शिवसेनेने युतीधर्म पाळला नाही. जनादेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षांसोबत गेल्याचे शाह म्हणाले होते. शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी अमित शाह यांना सव्वा वर्षांनी शुद्ध आली, याचा मला आनंद असल्याचे म्हटले आहे.
सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा घेतला समाचार -
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आंदोलनाबाबत सेलेब्रिटिंनी केलेल्या ट्विटचा देखील समाचार घेतला. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केले पाहिजे, यावर सेलिब्रिटिंनी आता कुठे शुद्ध आली आहे. शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानापासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतजमिनी हिसकावण्याचा प्रयत्न व्हायला नको, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. मात्र, मग्रूर सरकार त्यांच्याशी बोलणी करायला तयार नाही. उलटपक्षी तुम्ही आमच्याकडे या, मग चर्चा करू, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, जो मूळ पाया आहे,अशा शेतकऱ्यांच्या दारी सरकारने जायला पाहिजे, असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.