जळगाव- माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी आपण शिवसेनेच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. आमदार होण्याची स्वप्ने उराशी बाळगून असलेल्या भाजपच्या इच्छुकांच्या अडचणीत देखील सुरेश जैनांच्या भूमिकेमुळे आता भर पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चाचपणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी 'आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची वाताहत झाली आहे. शहराचा विकास खुंटला आहे. भविष्यात शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यांची ही भूमिका भाजपच्या अडचणी वाढवणारी तर आहेच, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचा संकेत देणारी आहे.
सुरेश जैन यांच्या भूमिकेमुळे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांची मोठी गोची होणार आहे. कारण ते विद्यमान आमदार असून भाजपकडून इच्छुक असलेल्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जैन यांच्यामुळे भोळेंचा पत्ता कापला जाईल. लोकसभा निवडणुकीतील भाजप-सेनेची युती विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहिली तर युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रात ही जागा सेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कारण ही जागा यापूर्वीही सेनेकडेच होती. त्यामुळे सेना या जागेवरील हक्क सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू सर्वत्र उधळत आहे. अशा परिस्थितीत भाजप 'मोठा भाऊ' म्हणून विद्यमान आमदार असलेली जागा सेनेला सोडण्याचे औदार्य दाखवेल का? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता या घडीला तरी नाकारता येणार नाही.
भाजपच्या नेतृत्वावर नाराजी?
राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेच्या माध्यमातून एकत्र नांदत असल्याचे वरवर दिसत असले तरी या ना त्या कारणांवरून शिवसेना वेळोवेळी भाजपवर निशाणा साधते. राज्यात असलेले हेच चित्र सध्या जळगाव महापालिकेसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे नेते व कार्यकर्ते गळ्यात गळा घालून फिरले. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता कधीच नव्हती. निवडणुकीनंतर ते समोर देखील आले. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत भाजपने सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांसाठीचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. याच मुद्द्यावरून ठिणगी पडली. पुन्हा भाजप-सेनेचे फाटले. भाजपच्या नेतृत्वावर सेनेची नाराजी असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. हीच नाराजी उघडपणे दाखवण्यासाठी सुरेश जैन यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मार्ग निवडला आहे.