जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती झाली, तर जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. याबद्दलचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, की जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे ११ तर शिवसेनेचे १२ जिल्हा परिषद सदस्य आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक सभापती आहेत. या मतदारसंघाचा मागच्या काळातील राजकीय आलेख पाहिला तर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपला चांगला लीड मिळाला आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी सोडावी, असा आमचा आग्रह आहे.