महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव महापालिकेत अवतरले कुंभकर्ण! रस्त्यांच्या विषयावरून शिवसेना आक्रमक - जळगाव महापालिका बातमी

रस्त्यांवरील खड्डे, धूळ यामुळे जळगावकर नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ओरड होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, आता गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजले आहेत.

shivsena agitation for road repair in jalgaon
shivsena agitation for road repair in jalgaon

By

Published : Aug 17, 2020, 4:48 PM IST

जळगाव - शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळत नाही. अशी परिस्थिती असताना महापालिका प्रशासनाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेकडून सोमवारी दुपारी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजप कुंभकर्णी झोपेत असल्याची टीका करत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुंभकर्णाच्या वेशभूषेत असलेल्या व्यक्तीसह महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

जळगाव शहरातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरासह प्रमुख उपनगरांमध्ये प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळातील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले होते. हे काम संथगतीने सुरू असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली होती. रस्त्यांवरील खड्डे, धूळ यामुळे जळगावकर नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल ओरड होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, आता गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा तीनतेरा वाजले आहेत.

सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहने चालवताना कसरत करावी लागते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत आहे. अनेक वाहन चालकांना पाठीचे, मानेचे तसेच मणक्याचे विकार जडत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे. या प्रश्नी आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली असताना महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी दुपारी शिवसेनेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने महापालिका आयुक्त आणि भाजप आमदार सुरेश भोळे यांना लक्ष केले. आमदार भोळे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

कुंभकर्णाच्या वेषभूषेने वेधले लक्ष..

जळगाव महापालिकेत अवतरले कुंभकर्ण! रस्त्यांच्या विषयावरून शिवसेना आक्रमक

शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपला शहराच्या विकासाचा विसर पडला आहे. वर्षभरात शहराचा विकास करण्याचे भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे. भाजपचे आमदार नुसत्या आढावा बैठका घेऊन वेळ मारून नेतात. अधिकारीवर्ग त्यांचे ऐकत नाही. अशा परिस्थितीत कुंभकर्णी झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती लवकर झाली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिला.

मागील आठवड्यात देखील शिवसेनेने शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये कमळाची फुले सोडत आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतरही रस्ते दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे सोमवारी पुन्हा आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details