जळगाव- सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आपला पाय घट्ट रोवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा वापर करून घेत, शिवसेना पक्ष संघटन बळकटीसाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना मोर्चेबांधणी करत असल्याचे वरवर दिसत असले, तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची 'पायाभरणी' हा त्यामागचा मूळ उद्देश असल्याचेही बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने नुकतेच संघटनात्मक बदल करण्यात आले. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात पूर्वी प्रत्येकी एक जिल्हाप्रमुख होते. आता मात्र, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेवर बारकाईने लक्ष असावे म्हणून दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी २ जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. एवढेच नाही तर जिल्हा प्रमुखांवर नियंत्रण हवे म्हणून सहसंपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात आता २ सहसंपर्कप्रमुख तर ४ जिल्हाप्रमुख नियुक्त केले असून, त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकद वाढवून प्रमूख शत्रू असलेल्या भाजपला शह देणे, त्याचप्रमाणे सध्या मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर दबदबा निर्माण करणे हे शिवसेनेचे प्रमुख लक्ष असल्याचे सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसत आहे.
सध्या जिल्ह्यात शिवसेना आहे मोठा पक्ष -
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ मतदारसंघात शिवसेनेचे, ४ भाजपचे तर उर्वरित २ मतदारसंघात प्रत्येकी १ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. २०२४ मध्ये आमदारांची संख्या वाढवण्यासह आपले खासदार निवडून आणण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. येथील ३ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघातही २ आमदार आहेत. खासदारकीच्या अनुषंगाने आता शिवसेनेची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यासाठी संघटनात्मक फेरबदल करून पक्ष संघटन बळकटीवर शिवसेनेने भर दिला आहे.
गटबाजी कशी रोखणार?
एकीकडे पक्षसंघटन वाढीसाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखली जात आहे. मात्र, या संघटनात्मक फेरबदलात पक्षातील काही निष्ठावान नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे पक्षात गटबाजी वाढण्याची शक्यता आहे. गटबाजीचे आव्हान पक्षश्रेष्ठी कसे स्वीकारतात? हे पाहणे देखील या पुढच्या काळात महत्त्वाचे असणार आहे.