जळगाव - शहरातील विविध रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. भाजीपाला, फळे तसेच इतर साहित्य विक्री करणाऱ्यांच्या हातगाड्यांमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज (मंगळवारी) शिवसेनेच्या वतीने महापालिका इमारतीसमोर 'भाजीपाला व फळे विक्री' आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरात सध्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह कॉलनी परिसरातील लहान-मोठ्या रस्त्यांवरही भाजीपाला, फळे विक्री करणारे हॉकर्स व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुख्य बाजारपेठेत तर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्त्यावर भाजीपाला, फळे विक्री करणारे सायंकाळी उरलेला भाजीपाला आणि खराब झालेली फळे रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या विषयासंदर्भात नागरिक सातत्याने महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करतात. मात्र, महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग दुर्लक्ष करत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विषयाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.