जळगाव : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र असले, तरी जळगावात मात्र स्थानिक नेतेमंडळीत वितूष्ट असल्याने मिठाचा खडा पडल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ खडसे विरूद्ध शिवसेना आमदार चंद्रकांत पाटल खडसेंचा चंद्रकांत पाटलांनावर हल्लाबोल
बोदवडला काल (1 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा झाला. या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी एका कथित ऑडिओ क्लिपच्या विषयाला हात घातला आणि आमदार चंद्रकांत पाटलांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले.
पाटलांचा खडसेंना इशारा
खडसेंच्या वक्तव्यावरून आमदार चंद्रकांत पाटलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील तातडीने पत्रकार परिषद घेत खडसेंना निर्वाणीचा इशारा दिला. 'पक्ष बदलल्यानंतर देखील एकनाथ खडसे यांना अजूनपर्यंत काहीही मिळालेले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात त्यांना कधी लपावं लागतं तर कधी पळावं लागतंय अशी परिस्थिती आहे. त्यांना तीन-तीन वेळा कोरोना होतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे', अशी मिश्किल टीका आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
एखादा शूटर लावा अन् मारून टाका...
'एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये, अन्यथा मी देखील लेव्हल सोडून बोलेन. मी एकनाथ खडसे यांचा कधीही अनादर केलेला नाही. त्यामुळे त्यांनी तोंडाला कुलूप लावावे. व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत खडसे हे माझे नाव जोडत असून, त्यांनी ही क्लिप मतदारसंघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवावी. जेणेकरून कोणाची काय पात्रता आहे, हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. मी जनतेची कामे करत असल्याने त्यांना रुचलेले नाही. खडसेंना वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे. माझे कुटुंब छोटे आहे. त्यामुळे माझ्या बाजूने बोलणारे कुणीही नाही', असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा तापले आहे.
पाटील-खडसेंच्या वादाचे कारण
चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंचा पराभव केला होता. तेव्हापासून दोघांमधले संबंध आणखीनच ताणले आहेत. आता कथित ऑडिओ क्लिपच्या विषयावरून दोन्ही नेत्यांमधील वाद वाढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नेमका काय आहे विषय?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपबाबत माहिती दिली. यावेळी खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सांगत खडसेंनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आपण या मतदारसंघातील महिलावर्गाच्या सुरक्षेबाबत बोललो होतो. आता त्याचा प्रत्यय येत आहे. ती ऑडिओ क्लिप जनतेपर्यंत पोहचवा, कळू द्या जनतेला, असे आवाहन खडसेंनी केले होते.
हेही वाचा -गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी दिले होते का? पाहा भुजंग बोबडे यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत