जळगाव - जळगाव तालुक्यातील तापी नदीवर असलेला शेळगाव मध्यम प्रकल्प राजकीय अनास्थेमुळे रखडला आहे. आता लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते मंडळींकडून शेळगाव मध्यम प्रकल्पासह निम्न तापी प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. आघाडी सरकारच्या काळात जो भ्रमनिरास झाला तोच प्रकार आताही घडू नये, असा जनतेचा सूर आहे.
तापी नदीवर असलेला शेळगाव मध्यम प्रकल्प राजकीय अनास्थेमुळे रखडला आहे. सातत्याने दुष्काळाला तोंड देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तापी, गिरणा यासारख्या मोठ्या नद्या जिल्ह्यातून वाहतात. परंतु, या नद्यांवर सिंचनाचे मोठे प्रकल्प न झाल्याने जिल्ह्यात पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्याचे राजकारण ज्या दोन मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या अवतीभोवती फिरते ते म्हणजे अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प आणि जळगाव तालुक्यातील शेळगाव मध्यम प्रकल्प. राजकीय अनास्थेमुळे हे दोन्ही सिंचन प्रकल्प रखडले आहेत.
जिल्ह्यातील भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना शेळगाव मध्यम प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नंतरच्या काळात आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, दुर्दैवाने आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पासाठी एक रुपयाही निधी मिळाला नाही. आता युतीचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असल्याने, त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्ह्यातीलच असल्याने या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून ७७० कोटी रुपयांची तरतूद करून ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून सध्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या पावसाळ्यात ५० टक्के पाणी अडेल, असा दावा सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. आघाडी सरकारच्या काळातही असाच दावा केला जात होता. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे आता तीच वेळ येऊ नये, असा शेतकऱ्यांचा सूर आहे.
शेळगाव मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ४.११ टीएमसी इतकी आहे. हा प्रकल्प जळगाव, भुसावळ आणि यावल तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे या तिन्ही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. मात्र, हा प्रकल्प कधी पूर्ण होईल, हा खरा प्रश्न आहे.