जळगाव - शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा परिसरात एका सदनिकेत चालणारा कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. याप्रकरणी 6 महिलांसह 3 आंबटशौकिन ताब्यात घेण्यात आले आहेत. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. तर रविवारी दुपारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली एक महिला राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने खळबळ उडाली आहे.
पिंप्राळा परिसरातील एका सदनिकेत एक महिला बचतगटाच्या नावाखाली काही महिला आणि तरुणींना सोबत घेऊन वेश्या व्यवसाय करत होती. या बाबतची माहिती सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने वेश्या व्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी तोतया ग्राहक पाठवून छापा टाकला. यावेळी 6 महिलांसह 3 आंबट शौकिनांना अटक करण्यात आली. संबंधित महिलेने बचतगटाच्या कामासाठी सदनिकेत खोली भाड्याने घेतली होती. मात्र, त्याठिकाणी गैरप्रकार सुरू होता. या रॅकेटचे धागेदोरे जिल्हाभरात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक तपास सुरू आहे.