जळगाव - शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत जाहीर केलेल्या हमीभावामध्ये यंदा उडदाच्या 400 तर मुगाच्या हमीभावात फक्त 221 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. या वर्षी मूग 7 हजार 196 रुपये तर उडीद 6 हजार प्रतिक्विंटल हमीभावाने शासन खरेदी करणार आहे.
सन 2018-19 मध्ये मुगाला 6 हजार 975 रुपये तर उडदाला 5 हजार 600 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. या वर्षी मुगाच्या हमीभावात शासनाने 221 रुपयांनी वाढ करून 7 हजार 196 रुपयांपर्यंत वाढ केली. उडदाच्या हमीभावात 400 रुपयांपर्यंत वाढ करून 6 हजार रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला. ऐन उडीद, मुगाचे पीक बहरात असताना सततच्या पावसामुळे प्रारंभी मुगाचे नुकसान झाले.
बहुतांश शेतकऱ्यांच्या हातचे मुगाचे पीक गेले. मुगाची पेरणी क्षेत्र कमी व त्यातच पिकाचे नुकसान झाल्याने या वर्षी मुगाचे भाव वधारले आहेत. आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासनातर्फे 7 हजार 196 रुपये प्रतिक्विंटल भावाने मुगाची खरेदी करण्यात येणार आहे. उडदाला 6 हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत पाचोरा, अमळनेरसह जळगाव येथे तीन खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आलेली आहे. या केंद्रांवर उडीद, मूग खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विपणन अधिकारी जी. एन. मगरे यांनी दिली. उत्पादन घटले, भावात तेजी, मुगाचा हंगाम सुरू झाला असून, भाव 7 हजारांच्या पुढे गेले आहेत. काही ठिकाणी मूग ८8 हजार रुपये क्विंटलने चांगल्या दर्जाच्या मुगाची खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र, पावसामुळे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा होणार नाही.