जळगाव- भाजपातील पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच गेल्या साडेचार वर्षांपासून पक्ष नेतृत्त्वावर नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे ते गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अलीकडे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाकडून न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून खडसेंनी यापूर्वी अनेकदा पक्षांतराचे संकेत उघडपणे दिले होते. तेव्हापासून त्यांच्या पक्षांतराचे आडाखे बांधले जात होते. दरम्यान, आता खडसे राष्ट्रवादीत जात असल्याने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. खडसेंसोबत सुरुवातीला त्यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत. खडसे यांच्यानंतर भाजपाचे अनेक नेते, आजी-माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल होण्याची शक्यता आहे.
आजवरच्या राजकीय वाटचालीत अभ्यासू व्यक्तिमत्त्व, आक्रमक नेतृत्त्व आणि मुरब्बी राजकारणी म्हणून एकनाथ खडसेंची ओळख राहिली आहे. मात्र, गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसेंना भाजपात सतत डावलले होते. २०१४ मध्ये राज्याच्या सत्तेत आल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाची मनिषा होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. महसूलसह १२ खात्यांचे ते मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या साऱ्या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याची आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून ते पक्षावर प्रचंड नाराज होते.
मंत्रिपद गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुनेच्या तिकिटासाठी देखील त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. विधानसभा निवडणुकीत तर ते स्वतःला तिकीट मिळवू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी पक्षाने कन्येला तिकीट दिले. दुर्दैवाने त्यांच्या कन्येचा पराभव झाला. त्यामुळे खडसेंच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला जबर धक्का बसला. कन्येच्या पराभवाला पक्षांतर्गत कुरघोड्या कारणीभूत असल्याची भूमिका घेऊन खडसेंनी भाजपा विरोधात मोट बांधली होती. आता तर त्यांच्या बंडाची धग तीव्र झाली होती. आपल्याला त्रास देण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख हात असल्याचा आरोप खडसेंनी त्यांचे नाव घेत उघडपणे केला. पक्षाकडून सतत अपमानित केले जात असल्याने ते वेगळा विचार करण्याच्या मनःस्थितीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीनंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे खडसे पक्षांतर करतीलच, या शंकेला बळ मिळाले. मध्यंतरी गोपीनाथ गडावर भाषण करताना देखील खडसेंनी आपल्या पक्षाच्या राज्य नेतृत्त्वाला लक्ष्य केले होते. 'आता आपलं काही सांगता येणार नाही', अशा शब्दांत त्यांनी तेव्हाही पक्षांतराचे संकेत दिले होते. त्यावेळी ते शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. पण अखेर खडसेंनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आहे.
पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादीची खेळी-
राष्ट्रवादी म्हणजे मराठा समाजाचे प्राबल्य असलेला पक्ष आहे. राष्ट्रवादीत असलेली जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य नेतेमंडळी ही मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करते. एकनाथ खडसे हे बहुजन समाजातील नेते आहेत. अल्पसंख्याक समाज देखील मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी आहे. पक्षसंघटन वाढीसाठी राष्ट्रवादीने खडसेंना आश्रय दिल्याचे बोलले जात आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, ही बाब ओळखून राष्ट्रवादीने ही राजकीय खेळी केली आहे. जळगाव जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. याठिकाणी 5 ते 6 आमदार निवडून येत होते. अशा परिस्थितीत शरद पवारांनी जिल्ह्यातील गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे या नेत्यांना मंत्रीपदाची संधीही दिली. पण जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन वाढले नाही. आता तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था खूप वाईट आहे. केवळ एकच आमदार प्रतिनिधित्व करत आहे. शरद पवारांना कदाचित एका दगडात दोन पक्षी मारायचे असतील. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाचे विस्तारीकरण करणे हा शरद पवारांचा हेतू स्पष्ट होत आहे. सध्या राज्याच्या सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्यामुळे भाजपा हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपाला शह देण्यासाठी खडसेंसारखा दुसरा पर्याय नाही. भविष्यातील निवडणूका लक्षात घेऊन खडसेंना 'फायर ब्रँड' नेता म्हणून रिंगणात उतरवले जाऊ शकते, असा शरद पवारांचा विचार या निर्णयामागे असू शकतो.
म्हणून खडसेंची भाजपाला सोडचिठ्ठी-
गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून खडसे न्यायासाठी पक्षाशी भांडत होते. पण त्यांच्या बाबतीत भाजपा निर्णय घेत नव्हते. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसेंना पद्धतशीरपणे बाजूला सारले गेले. विधानसभेत तिकीट नाकारले, त्यानंतर कोअर कमिटीतून बाजूला करत निर्णय प्रक्रियेतूनही काढले. नंतर विधानपरिषद, राज्यसभेची संधी नाकारली. आता तर अलीकडेच राज्य कार्यकारिणीतूनही बाद केले होते. खडसेंपेक्षा खालच्या फळीतील नेते असलेले विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचे पुनवर्सन झाले. पण खडसेंना मात्र, भाजपाने सापत्न वागणूक दिली. या साऱ्या घडामोडींमुळे खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.