जळगाव - शिक्षिकेची बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी तिच्या पतीकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकाला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. चेतन भिका वानखेडे (वय ४२, रा. मोचीनगर, धरणगाव) असे अटक केलेल्या लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे.
बालसंगोपन रजा मंजुरीसाठी दीड हजारांची लाच घेणारा वरिष्ठ सहाय्यक जाळ्यात - Jalgaon Zilla Parishad News
शिक्षिकेची बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी तिच्या पतीकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकाला पकडण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक आहेत. दरम्यान, तक्रारदार यांच्या पत्नीने बालसंगोपन रजा घेतलेली होती. ही रजा मंजूर करण्यासाठी तक्रारदार बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी चेतन वानखेडे याने त्यांच्याकडे १ हजार ५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंध विभागात येऊन तक्रार केली. यानंतर काही वेळातच पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकुर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, मनोज जोशी, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी यांच्या पथकाने सापळा रचून वानखेडे याला लाच घेताना रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे याला अटक करुन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.