जळगाव - राज्यातील कमीत कमी ५० वीज वाहिन्यावरील अंदाजे २५ हजार शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आहे. या योजनेतंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पाच कृषि वाहिन्यांची निवड झाली आहे. यात पारोळा तालुक्यातील मेहुतेहू, उंदिरखेडा, शेळावे, विचखेडा, शेवगे या उपकेंद्रातील वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे उर्जामंत्र्यांनी पालकमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषीपंपाना दिवसा ८ तास किंवा रात्री १० तास आठवड्यात चक्राकार पध्दतीने थ्री फेज वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु रात्रीच्या वेळेस कृषीपंपाना देण्यात येणा-या विद्युत पुरवठ्यामुळे येणा-या अडचणी तसेच शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सुचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेव्दारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी विज कृषी वाहिनीव्दारे दिवसा देण्याचे निश्चित केले असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले आहे.