जळगाव -दिवाळीच्या काळानंतर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याने खबरदारी म्हणून, जिल्ह्यातील शाळा 7 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज (रविवारी) सायंकाळी उशिरा काढले. कोरोना संसर्गाचा वेग आणि परिस्थिती लक्षात घेऊन 7 डिसेंबरनंतर शाळा उघडण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची घंटा उद्या वाजणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील शाळा 7 डिसेंबरपर्यंत राहणार बंद; कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाचा निर्णय - जळगाव शाळा
दिवाळीच्या काळानंतर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याने खबरदारी म्हणून, जिल्ह्यातील शाळा 7 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
राज्यात मार्चपासून कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. त्यामुळे चालू वर्षाच्या शैक्षणिक सत्रात शाळा उघडल्याच नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू झाले. मात्र, ऑनलाईन शिक्षण प्रणाली पाहिजे तेवढी प्रभावी ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन, अनलॉकच्या अनुषंगाने शाळा उघडण्याची मागणी केली जात होती. दिवाळीच्या पूर्वी कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात ओसरला होता. त्यामुळे अनेक क्षेत्रातील अनलॉकच्या टप्प्यात काही बाबींना शिथिलता प्रदान केली जात आहे. याच धर्तीवर राज्य शासनाने दिवाळीनंतर राज्यातील शाळा उघडण्याचे संकेत दिले होते.
23 नोव्हेंबरपासून काही ठिकाणी उघडतील शाळा-
दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरपासून राज्यातील काही भागात शाळा उघडणार आहेत. शाळा उघडण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, शाळा परिसर, वर्ग खोल्या निर्जंतुकीकरण करणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उघडण्यासंदर्भात एसओपी जाहीर केली आहे. त्यानुसार, कोरोनाचा संसर्ग कमी असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा उघडणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार नाहीच-
दिवाळीनंतर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. दररोज दोन आकडी संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील शाळा 7 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रविवारी सायंकाळी उशिरा काढले. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर 7 डिसेंबरनंतर शाळा उघडण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. शाळांच्या विषयासंदर्भात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जळगावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मूव्हमेंट झाल्याने येत्या दोन आठवड्यात कोरोनाचा संसर्ग कसा वाढतो? हे लक्षात येईल, त्यानंतर शाळा उघडण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.