जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये दि. 23 पासून बंद करण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती नसल्याने मंगळवारी जळगाव शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र, शाळा-महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेली टाळे पाहून त्यांना माघारी परत जावे लागले. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अधीन राहून राज्य शासनाने शाळा-महाविद्यालये उघडण्यास हिरवा कंदील दाखवला होता. शाळा व महाविद्यालये उघडून आता कुठे शैक्षणिक सत्राची गाडी रुळावर येत होती, तोच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा एकदा शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग कधी आटोक्यात येईल, याची खात्री नसल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे.
अशा प्रकारचे आहेत आदेश -
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्यासाठी संबंधित शाळा व महाविद्यालयांना सूट देण्यात आली आहे.