जळगाव :राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अन्य आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यात अनिल पाटील यांचा देखील समावेश आहे. राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आज प्रथमच आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले आहेत. अनिल पाटील यांच्या स्वागतासाठी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क रस्त्यावर दुतर्फा उभे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभे करण्यात आलेले विद्यार्थी, हे अमळनेर येथील मराठी आश्रम शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शिंदे- भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे अनिल पाटील मंत्री झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर पहिल्यांदा अनिल पाटील यांचे जळगावात आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत देखील करण्यात आले. मात्र मंत्री अनिल पाटील त्यांच्या अमळनेर मतदारसंघात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत मला कोणतीही कल्पना नसल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.