जळगाव -राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आक्रमक होत जळगाव तालुक्यातील विविध गावांमधील शाळकरी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी शहर बसस्थानकात आंदोलन केले. बसेस वेळेवर न सुटणे, गावाच्या थांब्यांवर बसेस उभ्या न करणे, अशा कारणांनी कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत सुमारे अर्धा ते पाऊण तास बसेस रोखून धरल्या. अखेर, एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत सेवेचे आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
जळगाव तालुक्यातील गिरणा नदी पट्ट्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा तसेच भोकर या गावांमधील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जळगावात येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एस. टी. महामंडळाच्या वतीने या गावांच्या मार्गावर सोडण्यात येणाऱ्या बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे. बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे तासिका बुडतात. शाळेत उशिरा आल्याने शिक्षक दंड आकारतात. प्रसंगी शिक्षाही करतात. एवढेच नव्हे तर या मार्गावरील बस फेऱ्या देखील कमी केल्याने बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे चालक-वाहक अनेक गावांच्या थांब्यांवर बस थांबवत नाहीत.
हेही वाचा -टोलनाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजेंसह 80 जणांवर गुन्हा