जळगाव -कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अतिशय तीव्र आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. तरीही काहींना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोना किती भयावह आहे, याचा प्रत्यय आणणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदा शहरात वास्तव्यास असलेल्या परदेशी कुटुंबातील तब्बल सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अवघ्या महिनाभराच्या काळातच या परिवाराने सहा आप्तांना गमावले आहे. दरम्यान, या कुटुंबातील एका महिलेचा काल (मंगळवारी) सायंकाळी जळगावात एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, संबंधित रुग्णालयाने हा आरोप फेटाळून लावला.
सावदा येथील परदेशी कुटुंब हे कर्तबगार आणि प्रतिष्ठीत मानले जाते. या कुटुंबातील पत्रकार म्हणून कार्यरत असणारे कैलाससिंह गणपसिंह परदेशी (वय 55) यांचे गेल्या महिन्यात 25 तारखेला कोरोनाचा उपचार सुरू असताना निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे बंधू किशोरसिंह गणपतसिंह परदेशी (वय 52) आणि त्यांची पत्नी संगीता किशोरसिंह परदेशी (वय 48) यांचे देखील कोरोनाचा उपचार सुरू असताना अनुक्रमे 21 व 25 मार्च रोजी निधन झाले. परदेशी कुटुंबीय या धक्क्यातून सावरत नाही, तोच कैलाससिंह आणि किशोरसिंह परदेशी यांच्या मातोश्री कुवरबाई गणपतसिंह परदेशी यांचे अन्य व्याधीवर उपचार सुरू असताना निधन झाले होते. अवघ्या आठवडाभरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.
ऑक्सिजन अभावी महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप