जळगाव -नैसगिक सौदर्यांचा खजिना असलेला सातपुडा पर्वत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या ज्वाळांनी धुमसतोय. सातपुडा पर्वत रांगांमध्ये वणवा पेटला असून, त्यामुळे निसर्गसंपदेसह वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विष्णापूर, वराड क्षेत्रासह अडावद वनक्षेत्रातील चिंचपाणी, वर्डी, वरगव्हाण भागातील सुमारे ८०० हेक्टर क्षेत्राचे जंगल जळून खाक झाले आहे. यामध्ये शेकडो सरपटणाऱ्या जीवांसह अनेक पक्ष्यांचे घरटे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. हा वणवा त्वरित आटोक्यात आणावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.
वन्यजीवांसह दुर्मीळ वनस्पतीचा खजिना-
जळगाव जिल्ह्याला सुमारे ११० ते १२० किलोमीटर अंतराची सातपुडा पर्वताची वनसंपदा लाभलेली आहे. वाघ, बिबट्या, अस्वल अशा वन्यजीवांसह दुर्मीळ वनस्पती सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अतिक्रमण, शिकारी, वृक्षतोड तसेच वणवा अशा प्रकारे ही वनसंपदा नष्ट होण्याचा मार्गावर आहे. वन विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी कमी मनुष्यबळामुळे ही वनसंपदा वाचवण्यासाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातपुड्यातील वैजापूर व अडावद या दोन्ही वनविभागात वणवा पेटला आहे.