महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात 'सारी' आजार पसरतोय पाय? १६ दिवसात १७ जणांचा श्वसन विकाराने मृत्यू - latest corona update

१३ जणांचा मृत्यू हा सारी आजाराने झाल्याची भीती आहे. सारी आजाराची लक्षणे ही कोरोना आजाराप्रमाणेच असतात. मात्र, हा आजार झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जळगाव
जळगाव

By

Published : Apr 17, 2020, 8:46 PM IST

Updated : Apr 17, 2020, 9:43 PM IST

जळगाव- कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वेगाने फैलावत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना जळगावात मात्र, 'सिव्हिअर अ‌ॅक्युट रिस्पायरेटरी इन्फेक्शन' म्हणजेच 'सारी' हा आजार पाय पसरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या १६ दिवसात कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश जणांना श्वसनाचा त्रास होता. त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह वगळता १३ मृतांचे कोरोना तपासणीचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर ३ मृतांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

जळगाव

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगावात पहिला काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर जळगावात सातत्याने कोरोनासदृश्य आजाराचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, गेल्या ३० मार्च ते १५ एप्रिल या अवघ्या १६ दिवसांच्या कालावधीत याठिकाणी मृत्यू झालेल्यांमध्ये ९ पुरुष तर, ८ महिलांचा समावेश आहे. मृतात ६० वर्षांवरील ९ जणांचा समावेश आहे. तसेच १५ ते ६० या वयाेगटातील ५ जण आहेत. १५ वर्षांखालील ३ जणांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.

या १७ मृतांमध्ये शहरातील सालारनगरातील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. हा वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या वृद्धाचा अपवाद वगळता १७ मृतांपैकी १३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. परंतु, त्यांचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित ३ मृतांचे अहवाल अद्याप जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मिळालेले नाहीत. दरम्यान, १३ जणांचा मृत्यू हा सारी आजाराने झाल्याची भीती आहे. सारी आजाराची लक्षणे ही कोरोना आजाराप्रमाणेच असतात. मात्र, हा आजार झालेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

'सारी' रुग्णांबाबत अहवाल पाठवण्याचे आदेश - काेराेना विषाणू पाठाेपाठ 'सारी' आजारामुळे मृत्यू हाेणाऱ्या रुग्णांची संख्या देशात व राज्यात झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आराेग्य विभागाने सर्व जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयांना सारीचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण व मृत्यू झालेल्यांचा अहवाल दरराेज निर्धारित फाॅरमॅटमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गुरुवारपासून हा अहवाल पाठवण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Last Updated : Apr 17, 2020, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details