जळगाव -येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असलेल्या बहिणाबाई अध्यासन केंद्राच्या धर्तीवर संत मुक्ताई व संत वाड्मय अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (शुक्रवारी) जळगावात केली. या विषयासंदर्भात बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात येईल. दोन्ही अध्यासन केंद्रांसाठी राज्य सरकारच्यावतीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ, असेही मंत्री सामंत यावेळी म्हणाले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संत मुक्ताई अध्यासन केंद्र सुरू होणार; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा - jalgaon news
कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. या परीक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांची परीक्षा घेण्याबाबत काय तयारी झाली आहे, याचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत घेत आहेत.
कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. या परीक्षा घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांची परीक्षा घेण्याबाबत काय तयारी झाली आहे, याचा आढावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत घेत आहेत. शुक्रवारी दुपारी ते जळगावातील विद्यापीठाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले होते. विद्यापीठात कुलगुरूंसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सामंत यांनी ही घोषणा केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या मंडळींकडून विद्यापीठात संत मुक्ताई आणि संत वाड्मय अध्यासन केंद्र असावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे प्रमाणपत्रे मिळतील-
यावर्षी पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा उल्लेख असणारी प्रमाणपत्रे मिळतील, अशी अफवा राज्यात पसरली आहे, याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, अशा प्रकारच्या अफवेवर कुणीही विश्वास ठेऊ नये. विद्यापीठांकडून ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीचे प्रमाणपत्र मिळेल. त्यावर कोरोनाचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसेल. असे असताना पदवीला अनुसरून राज्यातील कोणत्याही इंडस्ट्रीने वेगळ्या पद्धतीने ट्रीट करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित इंडस्ट्रीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोव्हेंबरमध्ये संधी मिळणार-
ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच नोव्हेंबरमध्ये पुन्हा परीक्षा देण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाने परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. 90 टक्के विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने तर 10 टक्के विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देत येणार नाही, त्यांना 15 दिवसात पुन्हा संधी मिळेल, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होणार नाही, अशा रितीने परीक्षा घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने विद्यापीठाला योग्य ती मदत करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.