महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत मुक्ताई पालखी सोहळा शिवशाही बसने पंढरपूरला रवाना; 40 वारकऱ्यांचा सहभाग - संत मुक्ताबाई पालखी सोहळा

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढीवारीच्या पालखी सोहळ्यावर मर्यादा आहे. मात्र, शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेला खंड नको म्हणून राज्य शासनाकडून पायी वारीऐवजी बसमधून पंढरपूरला जाण्यासाठी मोजक्या वारकरी प्रतिनिधींना परवानगी दिली जाते. त्यानुसार यावर्षी संत मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या.

संत मुक्ताई पालखी सोहळा
संत मुक्ताई पालखी सोहळा

By

Published : Jul 19, 2021, 9:36 AM IST

जळगाव -पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या वारीसाठी आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून आज (सोमवारी) पहाटे 4 शिवशाही बसने रवाना झाला. कोरोनामुळे मर्यादा असल्याने यावर्षी देखील पालखी सोहळ्यात 40 वारकऱ्यांचा सहभाग आहे. या सर्व वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात लसीकरण झालेले व अहवाल निगेटिव्ह आलेल्या वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढीवारीच्या पालखी सोहळ्यावर मर्यादा आहे. मात्र, शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेला खंड नको म्हणून राज्य शासनाकडून पायी वारीऐवजी बसमधून पंढरपूरला जाण्यासाठी मोजक्या वारकरी प्रतिनिधींना परवानगी दिली जाते. त्यानुसार यावर्षी संत मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या. हा पालखी सोहळा बसने बुलडाणा, जालना, बीड, येरमाळा, बार्शी मार्गे आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होईल, अशी माहिती संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी दिली.

संत मुक्ताई पालखी सोहळा
सोमवारी सायंकाळी बहीण-भावंडांची होणार भेट-संत मुक्ताईंच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरला रवाना झाल्या आहेत. या प्रवासात आज सायंकाळी संत मुक्ताई आणि ज्ञानेश्वर माऊलींची भेट होईल. त्यानंतर राज्यातील सर्व मानाच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतील. दरम्यान, आषाढी एकादशीच्या वारीसाठी गेलेला पालखी सोहळा हा पौर्णिमेपर्यंत पंढरपूरला मुक्कामी असेल. पौर्णिमेचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर पालखी सोहळा परत बसनेच मुक्ताईनगरला येईल, असेही अॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या गादी परंपरांचे पाईक सहभागी-पालखी सोहळा सोबत 40 वारकरी भाविकांना जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, पुजारी, मानकरी, सेवाधारी, संत मुक्ताबाई फडावरील महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकारांसह सद्गुरु सखाराम महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सदगुरू झेंडुजी महाराज, सद्गुरु दिगंबर महाराज, सद्गुरु पंढरीनाथ महाराज, सद्गुरु निवृत्ती बाबा वक्ते, सद्गुरु दत्तूजी महाराज, सद्गुरु मांगोजी महाराज, सारंगधर महाराज यांचा समावेश आहे.
संत मुक्ताई पालखी सोहळा
14 जूनला निघाला होता पालखी सोहळा-परंपरेनुसार यावर्षी 14 जूनला संत मुक्ताबाई पालखी सोहळा कोथळी येथील जुन्या मंदिरातून प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होऊन नवीन मंदिरात मुक्कामी विसावला होता. महिनाभर नवीन मंदिरातच नित्योपचार पूजा, कीर्तन, भजन पार पडले. आज, सोमवारी आषाढ शुद्ध दशमीला पहाटे 4 वाजता पालखी सोहळ्याने बसने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यावर्षी पादुका पूजेचा मान भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील वारकरी दीपक मराठे यांना मिळाला होता. मराठे दाम्पत्याने पूजा केली.

ABOUT THE AUTHOR

...view details