जळगाव - कोरोनाच्या संशयावरून रविवारी जळगावातील एका रुग्णाचे नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले. वैष्णोदेवी येथे फिरून आल्यानंतर रुग्णास त्रास जाणवू लागला होता. या घटनेमुळे जळगावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जळगावात कोरोनाच्या संशयावरून एका रुग्णाचे घेतले नमुने; अफवेमुळे नागरिकांमध्ये भीती हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर
शहरात राहणारे एक ५० वर्षीय प्रौढ ८ मार्च रोजी वैष्णोदेवी येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे बर्फवृष्टी झाल्यानंतर पावसात भिजलेही होते. ११ मार्च रोजी जळगाव परत आल्यानंतर रविवारी त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर सुरुवातीला ते खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना न्युमोनिया झाला असल्याचे निदान सुरुवातीला करण्यात आले. परंतु, कोरोनाचाही संशय वाटल्यामुळे त्यांना पुढील तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवले होते. रुग्ण तेथे न थांबता घरी निघून गेले होते. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या थुंकीचे नमुने घेतले आहे. हे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाचा संशय असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून विशेष कक्ष तयार ठेवला आहे. सुदैवाने या कक्षात आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झालेला नाही.