जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकामी नागरिक सहकार्य करत नसल्याने राज्य सरकारकडून आता कठोर निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वसामान्यांसाठी आज(बुधवार) दुपारी 3 वाजेपासून पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. यापुढे 31 मार्चपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
जळगाव जिल्ह्यात आता केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डिझेल उपलब्ध असणार आहे. मात्र, त्यासाठी देखील वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील व शहराच्या 3 किलोमीटर परिसरातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप 31 मार्चपर्यंत सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 4 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.