जळगाव- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे, शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाली असून शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. यामुळे, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर 'रोटरी सुरक्षित बाजार' भरवला आहे.
रोटरी सुरक्षित बाजारात सर्वसामान्य ग्राहकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून वाजवी दरात भाजीपाला, फळे मिळत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. हा बाजार लॉकडाऊन असेपर्यंत दररोज सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या बाजारात ग्राहकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून वाजवी दरात भाजीपाला मिळत असल्याने शहरातील अनेक जण येथे भाजीपाला तसेच फळे खरेदीसाठी हजेरी लावत आहेत.
दरम्यान, बाजारात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात भाजीपाला, फळे उपलब्ध असल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला, फळे खरेदी करावे लागत आहे. मात्र, रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने शेतकऱ्यांना वाजवी दरात भाजीपाला व फळ उपलब्ध होणार आहे. या बाजाराच्या माध्यमातून रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टने बचतगटातील १४ महिलांनाही काम उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमासाठी रॉटरीचे प्रकल्प प्रमुख डॉ. राजेश पाटील, सहप्रकल्प प्रमुख रमण जाजू, रॉटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष सुशीलकुमार राणे, मानद सचिव सुनील सुखवानी, अरुण नंदश्री, महेश सोनी, सरिता खाचने, अंकित जैन, सागर मंधान, शैलेश चव्हाण यांच्यासह ३५ रोटरीयन्सचे सहकार्य मिळत आहे.