जळगाव - प्लास्टिक मोल्डेड फर्निचर बनवणाऱ्या एका कंपनीतून अज्ञात चोरट्याने साडेबारा लाख रुपयांची रोकड लांबवले. ही चोरीची घटना जळगाव शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील स्वामी पॉलिटेक या कंपनीत शुक्रवारी पहाटे घडली असून, याप्रकरणी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गोदडीवाला हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे भरत हरिशकुमार मंधान (वय ३५) यांची एमआयडीसीत स्वामी पॉलिटेक या नावाने प्लास्टीक मोल्डेड फर्निचर बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीचे कामकाज भरत यांच्यासह त्यांचा लहान भाऊ सागर व मावस भाऊ वासुदेव उर्फ विक्की विजू पमनानी हे पाहतात. कंपनीचे मुख्य कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. भरत यांच्या कार्यालयाच्या बाजूला मावसभाऊ वासुदेव पमनानी यांची काचेची केबीन आहे. या केबीनमध्ये फेरीवाल्यांकडून जमा झालेले पैसे छोट्या कपाटात ठेवतात. भरत व वासुदेव या दोघांनी तीन ते चार दिवसांपासून जमा झालेली १२ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम कापडी पिशवीमध्ये कपाटात ठेवली होती. त्यानंतर कपाटासह केबीनही लॉक केली होती.
ऑफीसच्या खाली असलेल्या जिन्याचे चॅनेल गेट लावून त्याची चावी रात्रपाळीचे सुरक्षारक्षक रामभाऊ पाटील यांना दिली होती. दुसऱ्या शिफ्टचे रात्रपाळीचे कामगार कंपनीत काम करीत होते. त्यांना सूचना देवून दोघे घरी निघून गेले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने केबिन तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे ड्रॉवर तोडून रोकड चोरून नेली.