जळगाव -जिल्ह्यातील यावल शहरात भरदिवसा दरोड्याची घटना घडली आहे. सराफ व्यावसायिकाच्या कानावर बंदूक ठेऊन चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. ही घटना आज (बुधवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास, यावल शहरातील सराफ बाजारात असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले सराफ दुकानात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत सराफ बाजारात जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशिदास कवडीवाले नावाचे सराफ दुकान आहे. आज दुपारी दुकानात मोजके ग्राहक खरेदीसाठी आलेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास तीन तरुण दुकानात आले. त्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा केला. काही मिनिटात त्यांचा चौथा साथीदार त्याठिकाणी आला. त्याने दुकानात वर्दळ नसल्याची खात्री केल्यानंतर दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या दिशेने बंदूक रोखली. सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी करत दरोडेखोरांनी थेट कवडीवाले यांच्या कानावर बंदूक ठेवली. त्यानंतर दुकानात दागिन्यांच्या शोकेसची तोडफोड करून सुमारे सव्वा अकरा लाख रुपये किंमतीचे 24 तोळे सोन्याचे दागिने तसेच गल्लीतील 55 हजार रुपयांची रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले.
- हवेत केली फायरिंग?
अचानक झालेल्या या घटनेमुळे दुकान मालक जगदीश कवडीवाले तसेच कर्मचारी घाबरून गेले. दरोडेखोरांनी यावेळी हवेत फायरिंग केल्याचीही चर्चा आहे. परंतु, त्याला दुजोरा मिळालेला नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी दरोडेखोरांच्या हातून बंदूक खाली पडल्याचेही सांगितले. पळून जात असताना एक दरोडेखोर खाली पडला. तो पायी पळाला तर अन्य तिघे दुचाकीवरून पळाले.
- सुमारे 12 लाख रुपयांचा ऐवज चोरला-