जळगाव -शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानात शनिवारी रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करुन साडेतीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बळीराम पेठेतील शेरु अँड टॉवर या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर राम गंगूमल कटारिया (रा. गणेश नगर, जळगाव) यांच्या मालकीचे यू. जी. क्रिएशन नावाचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे राम कटारिया हे दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर लोखंडी टॉमीने(गाडीचे चाक बदलण्याचे अवजार) वाकवून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली 3 लाख 65 हजार रुपयांची रोकड आणि काही कपडे चोरांनी नेले. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आली.