जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे गावात रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून लाखो रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी सकाळी उजेडात आली असून, चोरट्यांनी किती रुपयांची रोकड लांबवली? याची माहिती अज्ञाप समोर आलेली नाही.
चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले एटीएम; जळगाव जिल्ह्यातील कुर्हे पानाचे येथील घटना - IDBI bank
कुऱ्हे पानाचे येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातून रोकड लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी लक्षात आल्यावर नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
कुर्हे पानाचे येथील बसस्थानक परिसरात आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. या एटीएम यंत्रात सुमारे साडेनऊ लाख रुपयांची रोकड होती, अशी प्राथमिक माहिती आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, त्यातील नेमकी किती रोकड चोरट्यांनी लांबवली, याची माहिती पोलीस पंचनामा सुरू असल्याने मिळू शकली नाही. सोमवारी सकाळी हा सारा प्रकार उजेडात आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. एटीएमच्या आतील भागात गॅसचे सिलिंडर व कटर आढळून आले आहे. यामुळे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मध्यरात्रीनंतर अडीच ते तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांसह बँकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वानाने एटीएम केंद्राच्या परिसराची पाहणी केली. मात्र, श्वान घटनास्थळाच्या आजूबाजूला घुटमळत राहिला, त्यामुळे पोलिसांच्या हाती फार काही लागले नाही. चोरी केल्यानंतर चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.