जळगाव - भुसावळ तालुक्यातील वरणगावात राजमल ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.मोहित उर्फ आकाश नरेंद्र जाधव (वय- २२) व सिद्धार्थ उर्फ सोनू अरुण मस्के (वय २४) अशी जामनेर तालुक्यातील पहूर येथून अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स हे ज्वेलरी शॉप अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यापासून आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना संबंधित चोरट्यांनी गोपनीय माहिती मिळाली. भुसावळ शहरातील व पहुर पाळधी येथील काही तरुण जळगाव जिल्ह्यात घरफोडी, मोटारसायकल, मोबाइल चोरीसारखे गुन्हे करत असल्याचे त्यांना कळले. त्या अनुषंगाने बकाले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल. सुनील दामोदरे, जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने पहुर येथून मोहित उर्फ आकाश जाधव याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर सिद्धार्थ उर्फ सोनू मस्के याच्या सांगण्यावरून वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याचे कबूल केले.