महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता.! एक-दोन पावसातच रस्त्यांचे तीनतेरा, जळगावकरांची वाट बिकट - रस्त्यांची बिकट दशा

जळगावात सुमारे दीड वर्षांपासून अमृत योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरासह उपनगरांमध्ये असलेल्या रस्त्यांवर खोदकाम सुरू असून या कामामुळे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. व यातच रस्त्यावरील खड्डे न बुजविल्याने आता पावसाळ्यात जळगावकरांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणी येत आहे.

जळगावकरांची वाट बिकट

By

Published : Jun 30, 2019, 7:49 PM IST

जळगाव - केंद्र सरकारच्या 'अमृत' योजनेंतर्गत जळगावात २५३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी शहरात व उपनगरांमधील रस्ते जागोजागी खोदण्यात आले. जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्यांवर खोदण्यात आलेले खड्डे ठेकेदाराने वेळतच न बुजविल्याने आता पावसाळ्यात याच खड्डयात पाणी साचून ते नागरिकांसाठी डोकेदूखी ठरत असून पावसामुळे नागरिकांना आता चिखलातून वाट काढावी लागत आहे


जळगावात सुमारे दीड वर्षांपासून अमृत योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे शहरासह उपनगरांमधील रस्त्यांवर खोदकाम सुरू असून या कामामुळे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. जलवाहिनी टाकल्यानंतर ठेकेदारांकडून रस्ते व्यवस्थितरित्या बुजविण्यात आलेले नाहीत. या पावसामुळे रस्ते चिखलाने भरले असून चिखलातून वाट काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिंप्राळा, निमखेडी, एमआयडीसी, अयोध्यानगर, मेहरूण परिसरातील रस्त्यांची अवस्था सर्वाधिक बिकट आहे. काही उपनगरांमधील रस्त्यांवर तर पायी देखील चालता येणार नाही, अशी स्थिती आहे.

रस्त्यांची बिकट दशा


शहरातील उपनगरांमध्ये पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेसाठी खोदलेल्या कच्च्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलामुळे वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे अनेक वर्षांपासून डागडुजी न झाल्याने पक्क्या रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही व वाहनांचे अपघात होतात. महापालिका प्रशासन आणि अमृत योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदारात समन्वय नसल्यानेच ही वेळ उदभवली आहे. शहराचा विकास होईल, या अपेक्षेने जळगावकरांनी भाजपकडे एकहाती सत्ता सोपवली. मात्र, भाजप मूलभूत सुविधा देखील देऊ शकला नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

रस्तावरील खड्ड्यांमूळे मार्गक्रमण कठीण होऊन बसले, जळगावकर झाले त्रस्त


रस्त्यांच्या समस्येसंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत आहेत. मात्र, अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची कामे होतील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अमृत योजनेच्या कामासाठी ठेकेदाराला नोव्हेंबर २०१९ पर्यंतची मुदत आहे. परंतु, कामाचा वेग पाहता ते अशक्य आहे. त्यामुळे जळगावकरांची गैरसोयीपासून सुटका होण्याची चिन्हे तूर्त तरी नाहीत, हे नक्की.

ABOUT THE AUTHOR

...view details