जळगाव - दोन आठवड्यांपासून दडी मारलेल्या पावसाचे आज जिल्ह्यात जोरदार आगमन झाले. सकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी रात्रीपासून मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात पाऊस सुरू आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यातून वाहणाऱ्या गोरक्षगंगा नदीला पूर आला आहे. बोदवड तालुक्यात काही ठिकाणी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पिके आणि ठिबक सिंचनाचे संचही वाहून गेले आहेत. यावल आणि रावेर तालुक्यातदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेतीसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. या पावसामुळे रखडलेली खरिपाची पेरणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे.