जळगाव -राज्य शासनाला सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणाऱ्या विभागांपैकी एक प्रमुख विभाग असलेल्या 'आरटीओ'ला कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने आरटीओला मिळणारा महसूल घटला आहे. जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वार्षिक महसुली उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला, तर जळगाव 'आरटीओ'चे महसुली उत्पन्न यावर्षी तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी घटले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे 40 ते 42 कोटी रुपयांचा फटका बसल्याने जळगाव आरटीओचे महसुली गणित बिघडले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग प्रत्येक क्षेत्रासाठी धोकेदायक ठरू लागला आहे. उद्योग आणि व्यवसायावरही कोरोनामुळे मोठा परिणाम झाला आहे. इतकेच काय तर, राज्य शासनाला मिळणारा महसूलही कोरोनामुळे थांबला आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला होता. या काळात उद्योगधंदे व व्यवसाय बंद होते. वाहन उत्पादक कंपन्याही मोठ्या संख्येने बंद होत्या. त्याचा परिणाम आरटीओ विभागाच्या महसुलावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरटीओला नवीन वाहनांची नोंदणी, रोड टॅक्स, थकीत कर वसुली, पसंतीचे वाहन क्रमांक, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स नोंदणी व नूतनीकरण, वाहन मालकीचे बदल तसेच वायूवेग पथकांच्या होणाऱ्या विविध प्रकारच्या कारवायांतून महसूल मिळतो. गेल्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या कारवाया व वाहनांच्या नोंदणीत घट झालेली आहे. त्यामुळे आरटीओचे महसुली उत्पन्न घटले असून, यावर्षी महसुली उत्पन्नाची वार्षिक उद्दिष्टपूर्तीही होऊ शकत नाही, अशी स्थिती जळगाव आरटीओची आहे.
40 ते 42 कोटींचा फटका -
जळगाव आरटीओ विभागाला राज्य शासनाकडून सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 144 कोटी 53 लाख रुपयांचे महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, अशी स्थिती आहे. आज अखेरपर्यंत जळगाव आरटीओला विविध मार्गाने अवघा 105 कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळाला आहे. महसुली उत्पन्नाच्या वार्षिक उद्दिष्टाचा विचार केला तर 40 ते 42 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
हेही वाचा -जळगाव : कडक निर्बंधांमुळे सराफ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ; दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी