जळगाव - राज्य सरकारच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याची मुदत शनिवारी १५ मे रोजी संपणार होती. परंतु, राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्य सरकारने हे निर्बंध १ जूनपर्यंत कायम केले आहेत. परंतु, कडक निर्बंध लागू असतानाही नागरिक सकाळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने, बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यातील "ब्रेक दी चेन"चे निर्बंध कायम राज्य सरकारच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याची मुदत शनिवारी १५ मे रोजी संपणार होती. परंतु, राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्य सरकारने हे निर्बंध १ जूनपर्यंत कायम केले आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात आता १ जूनपर्यंत हे निर्बंध वाढवण्यात आले आहेत. या काळात आता पूर्वी लागू असलेले सर्व निर्बंध कायम असणार आहेत. परंतु, किराणा साहित्य, फळे, भाजीपाला, दूध, अंडी, मांस यासारख्या वस्तूंच्या खरेदीसाठी, सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिकांना मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे दररोज सकाळी नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाजारात गर्दी होते. शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, गोलाणी, फुले मार्केट परिसर, गणेश कॉलनी, महाबळ परिसर या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते.
अत्यावश्यक सेवेतील दुकानांना मर्यादित वेळेत सूट
जिल्ह्यात निर्बंध लागू असले तरी, अत्यावश्यक सेवेतील दुकाने मर्यादित वेळेत खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही दुकाने रोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असतात. त्यानंतर वैद्यकीय सेवेतील मेडिकल, सर्जिकल साहित्य विक्री, शासकीय कार्यालये, बँका आणि वित्तीय संस्था यांना मुभा आहे. या वेतिरिक्त बाकी सर्व दुकाने व कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तसेच हॉटेल, बिअरबार आणि खानावळ यांना केवळ घरपोच वस्तू देण्याची परवानगी आहे. दरम्यान रमजान ईद व अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाने किराणा दुकाने व अत्यावश्यक सेवेतील इतर दुकानांना १ तास अधिकची मुभा दिलेली आहे. ही सूट केवळ (१४ मे) एक दिवसच असणार आहे. (१५ मे) पासून पूर्वीप्रमाणे निर्बंध लागू असतील.
पोलीस बंदोबस्त कायम
राज्य सरकारने निर्बंध कडक केल्याने १ जूनपर्यंत शहरातील पोलीस बंदोबस्त कायम आहे. प्रमुख चौकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने 'फिक्स पॉईंट' उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचे जवान तैनात असतात. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. त्याचप्रमाणे, महापालिकेचे फिरते पथक देखील गस्तीवर असते.
रुग्णसंख्येचा आलेख काही प्रमाणात घसरला
कोरोनाची दुसरी लाट जास्त धोक्याची ठरली आहे. मार्चनंतर या लाटेची तीव्रता वाढली. त्यानंतर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. या निर्बंधाचे आता जळगाव जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसत आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर घसरला आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याचे समोर आल्याने आरोग्य यंत्रणेला कहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात दररोज १० हजारच्या आसपास कोरोना चाचण्या होत आहेत. त्यात १ हजाराच्या आत नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे.
हेही वाचा -'लव्ह यू जिंदगी' म्हणणाऱ्या तरुणीचा कोरोनाने घेतला बळी; नेटकरी झाले भावूक
हेही वाचा -केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, याची माहिती जाहीर करावी - अजित पवार