महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध आणखी कठोर होणार; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे होत आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यात काही ठिकाणी नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत आहेत. असे नागरिक स्वतःबरोबरच दुसर्‍यांनाही बाधित करतात.

By

Published : May 15, 2021, 8:31 PM IST

abhijit raut
जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र, अद्याप कोरोनाची संपूर्ण साखळी तुटलेली नाही. त्यामुळे आता सोमवारी 17 मेपासून जळगाव जिल्ह्यात 'ब्रेक दी चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात येणार आहेत. सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच अत्यावश्यक सेवा खुली राहणार आहे. त्यात देखील गर्दी करणारे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे

जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्‍हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे उपस्थित होते.

...म्हणून निर्बंध होणार कडक -

राज्य शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे होत आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यात काही ठिकाणी नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत आहेत. असे नागरिक स्वतःबरोबरच दुसर्‍यांनाही बाधित करतात. लसीकरणासाठी होणारी अनावश्यक गर्दी, कोरोनाबाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईक, अरुंद गल्ली-बोळांमध्ये बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी, याशिवाय काही नागरिक सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान किराणा, भाजीपाला तसेच फळ विक्रीच्या दुकानांवर विनाकारण गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून 31 मेपर्यंत निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -ऑक्सिजन टॅंक संपला, मात्र हिम्मत कायम ठेवली; डॉक्टरांनी वाचवले २७० रुग्णांचे प्राण

लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना -

लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने उपलब्ध डोसनुसार आदल्या दिवशीच दुपारी 4 वाजेनंतर संबंधित लसीकरण केंद्रांवर कुपनचे वाटप नागरिकांना करावे. म्हणजे दुसऱ्या दिवशी अनावश्यक होणारी गर्दी टाळता येईल. कोरोना रुग्णांची आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे, असा विश्वास त्यांच्या नातेवाईकांना वाटावा यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून द्यावा. जेणेकरून नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी दवाखान्यात येण्याचा आग्रह धरणार नाहीत. यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

विनाकारण फिरणाऱ्यांची आता गय नाही - डॉ. प्रवीण मुंडे

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने दिलेल्या वेळेनंतरही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. यापुढे अशा विनाकारण करणार्‍यांवर अधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस व गृहरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आता गय केली जाणार नाही. त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिला.

हेही वाचा -जळगावातील समृद्धी केमिकल फॅक्टरीत सेफ्टी टँकमध्ये बुडून तीन कामगारांचा मृत्यू

भाजीपाला व फळ विक्रेते रडारवर -

कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करणे आता सर्वांना बंधनकारक असणार आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी फळ आणि भाजी विक्रेत्यांनी महापालिकेने नेमून दिलेल्या जागेवरच फळे व भाजीपाल्याची विक्री करावी. अनधिकृत जागेवर तसेच सकाळी 7 ते 11 या नियोजित वेळेआधी किंवा नंतर इतर कोठेही विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल. शहरातील मोठ्या चौकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा महापालिका प्रशासन आता कठोर कारवाई करेल, असा इशारा महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिला.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन सुरू -

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. जळगाव शहरात जवळील मोहाडी येथील महिला रुग्णालयात खास व्यवस्था करण्यात येत आहे. तिसर्‍या लाटेत तरूण व लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील बालरोग तज्ञांचा समावेश असलेला एक टास्क फोर्स तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी बाल रोग तज्ञांची बैठक देखील घेण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -'मोदी सरकारचे मापात पाप'; खते, बियाणांच्या वाढत्या किंमती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details