जळगाव- राज्य शासनाने पंचायत समिती सदस्य तसेच सभापतींच्या अधिकारांवर गंडांतर आणले आहे. विकासकामांसाठी 14 व्या वित्त आयोगातून देण्यात येणाऱ्या निधीला देखील कात्री लावली आहे. या बाबींचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील सर्व 15 पंचायती समिती सभापतींनी आपले राजीनामे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सोपवले. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील 134 पैकी काही सदस्यांनी देखील आपले राजीनामे सभापतींकडे दिले आहेत.
महाराष्ट्र पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून हे राजीनामे देण्यात आले असून आंदोलनाची सुरुवात जळगावातून झाली आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीची राज्यव्यापी बैठक जळगावाच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली होती. पंचायत समिती सभापती व सदस्यांच्या अधिकाऱ्यांवर राज्य शासनाने कात्री लावल्याने हवा तो सन्मान मिळत नाही. तसेच विकासकामांना देखील शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने विकास कामे कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नावाला पद मिरवण्यापेक्षा पंचायत समित्याच बरखास्त कराव्यात. यासाठी सर्वांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, असा निर्णय या बैठकीत झाला होता. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील 15 सभापतींनी आपले राजीनामे जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
राज्य शासनाने पंचायत समितीच्या सदस्यांचे अधिकार काढून घेतल्याने आम्हाला काहीही सन्मान उरलेला नाही. विकासकामांसाठी अत्यंत तुटपुंज्या निधीची तरतूद करण्यात आल्याने कामे करता येत नसल्याने लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सरपंचाला तरी मान आहे, पण आम्हाला मान राहिलेला नाही. त्यामुळे नावाला पद मिरवण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा, अशी उद्विग्न भावना राजीनामा देणाऱ्या सभापतींनी अध्यक्षांकडे व्यक्त केली.