जळगाव -डॉक्टर साहेब आमचे वडील तर गेले, ते परत येणार नाहीत. पण, आता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दुसऱ्या कोणत्याही रुग्णाच्या बाबतीत असं घडू देऊ नका.. याठिकाणी उपचार घेणारा प्रत्येक रुग्ण त्या-त्या घराचा आधार आहे. ज्या घराचा आधार जातो, त्या घराची अवस्था तुम्हाला माहिती नाही, अशा भावूक शब्दांत शिवाजीनगरातील मृत कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाच्या नातेवाईकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
येथील कोविड रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे मंगळवारी (11 ऑगस्ट) रात्री साडेसातच्या सुमारास एका 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा मृत्यू झाला. 12 दिवसांपूर्वी अत्यवस्थ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वृद्धाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवणे गरजेचे होते. डॉक्टरांनी तशा सूचना देखील सहाय्यकांना केल्या होत्या. मात्र, एकमेकांमध्ये असलेल्या 'कम्युनिकेशन गॅप'मुळे वृद्धावर जनरल वॉर्डातच उपचार सुरू राहिल्याने अखेर वृद्धाचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करत, जोपर्यंत रुग्णालय प्रशासन या घटनेची जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत वृद्धाच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे कोविड रुग्णालयात रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, बुधवारी (12 ऑगस्ट) सकाळी काही नागरिकांनी मृत वृद्धाच्या नातेवाईकांची समजूत घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली. शेवटी झाले-गेले विसरून वृद्धाचे नातेवाईक जड अंतकरणाने कोविड रुग्णालयात आले. त्यांनी सर्वप्रथम कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली. आमच्या रुग्णासोबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी होता. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. परंतु, यापुढे असा प्रकार कोणत्याही रुग्णासोबत घडू देऊ नका. आमचे वडील तर गेले, ते परत येणार नाही. आज ते आमच्यात नाहीत, त्यांना वेळेवर उपचार मिळाले असते तर आम्ही काहीतरी प्रयत्न निश्चित केले असते. पण, दुर्दैवाने ही वेळ आली. शेवटपर्यंत आम्हाला ही खंत कायम असेल. पण, आता निदान दुसऱ्या कोणासोबत असे घडायला नको, हीच अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालय प्रशासनाला केली 'ही' विनंती
मृत वृद्धाच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालय प्रशासनाला एक महत्त्वपूर्ण विनंती देखील यावेळी केली. कोविड रुग्णालयात कार्यरत असलेले काही स्थानिक डॉक्टर्स कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. हे डॉक्टर्स तत्काळ कोविड रुग्णालयात परत नियुक्त करण्यात यावेत. जेणेकरून स्थानिक डॉक्टर्स शहरातील नागरिकांनी चांगली सेवा देऊ शकतील. एकमेकांशी परिचित असल्याने रुग्ण देखील आल्या अडीअडचणी त्यांना सांगू शकतात, अशी विनंती यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्याकडे करण्यात आली. त्यावर डॉ. रामानंद यांनी या गोष्टीची दखल घेऊन आजच कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, कोविड रुग्णालयातील प्रत्येक रुग्णांवर बारकाईने लक्ष राहील, यासाठी डॉक्टरांना राऊंड वाढविण्याच्या सूचना देण्यात येतील, मी स्वतः दिवसभरात शक्य तेवढे अधिक राऊंड घेईल, असेही ते म्हणाले.