जळगाव - जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी रात्री जोरदार पुनरागमन केले आहे. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस बरसला आहे. चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगावात एकाच रात्रीत रेकॉर्डब्रेक १२३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ही चालू वर्षाच्या हंगामातील एकाच दिवशी झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद आहे. दरम्यान, जळगाव शहर व ग्रामीणमध्ये देखील मंगळवारी देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यातील एकूण सरासरीत वाढ झाली आहे.
चाळीसगाव तालुक्यात एकाच रात्रीत रेकॉर्डब्रेक १२३ मिलीमीटर पाऊस! - चाळीसगाव महापूर
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी रात्री जोरदार पुनरागमन केले आहे. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस बरसला आहे. चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात अद्यापही पावसाची तूट कायम -
यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अद्यापही १० ते १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून चाळीसगाव तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तितूर, डोंगरी व गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात १२३ मिमी पावसाची नोंद झाली असताना, इतर तालुक्यांमध्ये मात्र फक्त २५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९६ मिमी पाऊस होत असतो. त्यापैकी आतापर्यंत १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जळगाव शहरात दिवसभर पाऊस -
जळगाव शहरात मंगळवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. सकाळी १० वाजता पावसाने हजेरी लावल्यानंतर दुपारी ३ वाजता देखील विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. नंतर सायंकाळी ६ वाजेपासून शहरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली होती.
- जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस - ४१८ मिमी
- एकूण सरासरीच्या टक्केवारीत - ८२ टक्के
- या तालुक्यात सर्वाधिक पाऊस - चाळीसगाव (१४४ टक्के)
- या तालुक्यात सर्वात कमी पाऊस - चोपडा (५२.५ टक्के )
दिवसभरात झालेल्या पावसाची नोंद अशी-
- जळगाव- १३ मिमी
- भुसावळ- ११.७ मिमी
- यावल- ११.२ मिमी
- रावेर- ११.७ मिमी
- मुक्ताईनगर- ६.१ मिमी
- अमळनेर- १३.१ मिमी
- चोपडा- ८.६ मिमी
- एरंडोल- १३.८ मिमी
- पारोळा- १४.३ मिमी
- चाळीसगाव- १२३.२ मिमी
- जामनेर- ३१.४ मिमी
- पाचोरा- २०.४ मिमी
- भडगाव- १९.१ मिमी
- धरणगाव- ११.६ मिमी
- बोदवड- १७.९ मिमी