जळगाव -राज्यातील बहुसंख्य मतदारसंघात शेवटपर्यंत बंडखोरी कायम राहिली. बंडखोरीचा महायुतीच्या उमेदवारांच्या मताधिक्क्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, जागांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. यावेळी देखील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
बंडखोरीमुळे युतीच्या मताधिक्क्यावर परिणाम होईल, जागांवर नाही - गिरीश महाजन - महायुतीला स्पष्ट बहुमत
बंडखोरीचा महायुतीच्या उमेदवारांच्या मताधिक्क्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, जागांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. यावेळी देखील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
जामनेरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी महाजन यांनी संवाद साधला. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे. पावसामुळे शेतकरी, शेतमजूर असे सर्व जण शेतात न जाता घरी थांबून आहेत. त्यामुळे प्रत्येकजण स्वेच्छेने मतदानासाठी बाहेर पडला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता यावेळी ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी निश्चित वाढण्यास मदत होईल, असे महाजन म्हणाले. राज्याचा विचार केला तर युतीच्या २१० ते २१५ आणि खान्देशातून ४७ पैकी ३८ ते ४० जागा येतील, असा विश्वास महाजनांना आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.