जळगाव - भुसावळ तालुक्यातील फुलगावात माणुसकीचे दर्शन घडवणारी एक घटना घडली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एका असहाय्य वृद्ध महिलेच्या मृतदेहावर हिंदू संस्कृतीनुसार विधीवत अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे 'जनसेवा हीच ईश्वर सेवा' या उक्तीचा प्रत्यय येत आहे.
नातेवाईकांना धीर देत, वृध्द महिलेवर अंत्यसंस्कार
कोरोनाच्या कठीण काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आपल्या परीने शक्य ती मदत करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनसेवेचे असेच एक उदाहरण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या फुलगावात पाहायला मिळाले. फुलगाव येथील चंद्रभागा सीताराम सुतार (वय ६५) या वृद्धेचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्यामुळे गावातील कोणीही त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला पुढे येत नव्हते. अशातच ही माहिती वरणगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना कळाली. त्यांनी तत्काळ धाव घेत वृद्धेच्या दोन नातेवाईकांना सोबत घेऊन धीर दिला. त्यानंतर वृद्धेवर विधिवत अंत्यसंस्कार केले.