महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 15, 2019, 10:56 AM IST

ETV Bharat / state

जळगावात भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फिरवणार 'जिल्हाध्यक्ष' पदाची भाकरी

लोकसभा निवडणूकीत पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे.

भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी यांची नावे जिल्हाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहेत

जळगाव - पक्षातील गटबाजीला पूर्णविराम देण्यासाठी भाजपने मागील पंधरवड्यात आपला जिल्हाध्यक्ष बदलला होता. आता भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षसंघटन मजबुतीसाठी मराठा समाजाऐवजी अन्य समाजातील व्यक्तीला जिल्हा नेतृत्त्वाची संधी देण्याचा विचार सुरू आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी यांची नावे आघाडीवर आहेत.

लोकसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खाल्ला. त्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. मात्र, अॅड. पाटील यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चोखपणे सांभाळू शकेल, अशा व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

अॅड. पाटील हे पक्षसंघटन मजबूत करण्यात तसेच पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच पक्षाला लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाले नाही. यापूर्वी देखील पाटील यांच्या नेतृत्त्वाविषयी पक्षातील कार्यकर्ते नाराज होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाल्याने पक्षश्रेष्ठींनी अखेर भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पक्षसंघटन मजबुतीवर भर -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्यात पक्षसंघटन मजबुतीवर भर दिला जात आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने पक्षाने आतापर्यंत मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. जिल्ह्यात मराठा समाजापाठोपाठ तेली, माळी हे समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाऐवजी तेली किंवा माळी समाजाला नेतृत्त्वाची संधी देण्याचा विचार सुरू आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात येणाऱया भुसावळात माजी आमदार संतोष चौधरी हे तेली समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे भुसावळसह जिल्ह्यातील तेली समाजात चांगले प्रस्थ असल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे, जळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे माळी समाजाचे आहेत. जिल्ह्यात माळी समाज देखील मोठ्या संख्येने आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाजन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याने त्यांच्या नावाचाही विचार सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details