जळगाव -आज राव नवमी उत्सव आहे. कोरोनामुळे हा उत्सव सर्वत्र अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने देखील साध्या पद्धतीने आणि मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत राम नवमी उत्सव साजरा होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी राम नवमीला मंदिरात येऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नसल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
शहरातील जुने जळगाव परिसरात सुमारे दीडशे वर्षांची परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान आहे. याठिकाणी दरवर्षी राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा होत असतो. परंतु, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे हा उत्सव साजरा करण्यावर बंधने घालण्यात आली आहे. यावर्षी देखील कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने राम नवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. आज पहाटे श्रीरामांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी नित्य पूजा-अर्चा झाली. दुपारी राम नवमीच्या अनुषंगाने दरवर्षी वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित केला जाणारा कीर्तन सोहळा, मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, राम नवमीनिमित्त इतर धार्मिक कार्यक्रम मर्यादित स्वरुपात साजरे होणार असल्याची माहिती, श्रीराम मंदिर संस्थानचे प्रमुख गादिपती मंगेश महाराज जोशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
भाविक घेताहेत मंदिराबाहेरूनच दर्शन