जळगाव- मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी उद्या (२२ ऑक्टोबर) होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून राजेंद्र घुगे पाटील, तर शिवसेनेकडून नितीन बरडे यांच्यात लढत होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला. तर, शिवसेनेने देखील प्रशांत नाईक यांच्याऐवजी नितीन बरडे यांना संधी दिली आहे. भाजपाचे काही नगरसेवक नाराज असल्याने या नाराजीचा फायदा शिवसेनेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. काही नगरसेवकांनी बंडखोरी केली तरच, शिवसेनेला संधी आहे. अन्यथा बहुमताच्या जोरावर भाजपा निवडणूक जिंकू शकते.
भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत होतो का? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. मनपा स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्येच मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती. ललित कोल्हे, नवनाथ दारकुंडे हे देखील सभापतीपदासाठी इच्छुक होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राजेंद्र घुगे-पाटील यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित केले आहे. त्यामुळे, ललित कोल्हे व नवनाथ दारकुंडे यांच्या नाराजीचा फटका भाजपाला या निवडणुकीत कितपत बसतो हे उद्या होणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे.
जातीनिहाय गणित ठरू शकते निर्णायक
स्थायी समितीत भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. एकूण सोळा सदस्यांपैकी १२ सदस्य हे भाजपाचे असून बहुमतासाठी नऊ सदस्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला विजयासाठी भाजपाचे पाच नगरसेवक आपल्या बाजूने वळवावे लागणार आहेत. शिवसेनेचे तीन सदस्य असून एक सदस्य एमआयएमचा आहे. भाजपाच्या नाराज सदस्यांवर शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. मात्र, खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थायी समितीमधील जातीय गणित निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.